Tuesday, January 5, 2010

मी भाषेला बोलताना ऎकतो: सचिन केतकरची एक कविता

मी भाषेला बोलताना ऎकतो
सचिन केतकर


भाषा बोलतीय
मी ऎकतोय


सगळ्यांच्या पलीकडून ती बोलतीय
शेकडो वर्षांपासून
संततधार
अखंड
अव्याहात
भाषा बोलतीय मी ऎकतोय
लोकं तोंड फ़क्त हलवतायत
लोकाना वाटतय ते स्वत: बोलतायत
पण भाषाच बोलतीय
भाषेच्या उगमा पलिकडून


मी ऎकतोय
कित्येक नद्यांना पूर आले अन गेले
नद्यांनी कित्येकदा वाटा बदलल्या
भाषा थांबतच नाहीये
तिच्या सादेतूनच उभं होतं जग
हे घर हे झाड ही माणसं
भाषा बोलतीये


पण ती माझ्याशी बोलतीय का?
भाषा कोणाशीही बोलत नाहीये
म्हणून ती सगळ्यांशीच बोलतीये
पण भाषा स्वत:शीच बोलतीये फ़क्त
भाषेला बोलताना मी ऎकत नाहीये
मला बोलताना भाषा ऎकतीये


कारण अनादी काळा पासून
फ़क्त भाषाच बोलतीये
आणि भाषाच ऎकतीये


१४ ओक्टोबर २००९ सकळ्चे १२:१५

No comments: